Ad will apear here
Next
प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, निवेदक सुधीर गाडगीळ
प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांचा २५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय....
......
चित्रकार सावळाराम हळदणकर : 
चित्रकार सावळाराम हळदणकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८८२ रोजी सावंतवाडी येथे झाला. विद्यार्थिदशेतच त्यांनी चित्रकलेतील ग्रेड (श्रेणी) परीक्षेतही विशेष नैपुण्य संपादन केले. चित्रकलेच्या पुढील शिक्षणासाठी ते १९०३ मध्ये मुंबईला गेले आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक मातब्बर,  ज्येष्ठ कला-शिक्षकांचे व चित्रकारांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विद्यार्थिदशेपासूनच त्यांना चित्रकलेची अनेक पारितोषिके मिळत गेली आणि १९०७ पासून चित्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. मुंबई, चेन्नई, कोलकाता, सिमला, अमृतसर, म्हैसूर येथील प्रदर्शने,  तसेच दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटीची प्रदर्शने अशा सर्व ठिकाणी त्यांची चित्रे झळकू लागली व अनेक चित्रांना मानाची पारितोषिकेही मिळाली. त्यांनी १९०६ पासून १९५८ पर्यंत मुंबईतील बाँबे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या प्रदर्शनांमध्ये सातत्याने चित्रे पाठवली. 

त्यांनी नवोदित चित्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी १९०८ मध्ये दादर येथे चित्रकला वर्ग सुरू केला. पुढे त्याचाच विस्तार होऊन १९४० मध्ये गिरगाव येथे ‘हळदणकर फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’ ही संस्था स्थापन झाली. नव्या पिढीतील चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रदर्शनादी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी काही स्नेह्यांच्या सहकार्याने ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था १९१८ मध्ये स्थापन केली. आजही ही संस्था उत्तम कार्य करीत आहे. १९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मोहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. 

त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे,  निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश होतो. जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांतील तंत्रविशिष्ट बारकावे त्यांनी विलक्षण कौशल्याने आपल्या चित्रांतून दर्शविले. त्यांनी शुद्ध पारदर्शक जलरंगांत रंगविलेली चित्रे त्यांतील अप्रतिम तंत्रकौशल्यासाठी देश-विदेशात वाखाणली गेली. चित्रांत साधलेले छायाप्रकाशाचे परिणाम, चित्रणासाठी वापरलेल्या कमी-अधिक जाडीच्या रंगछटा व रंगलेपनाचे कौशल्य ही त्यांची शैलीवैशिष्ट्ये जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत जाणवतात.

त्यांच्या 'अ पायस लाइफ' (१९३५),  ग्लो ऑफ होप (जलरंग,  १९३६),  पोर्ट्रेट ऑफ मिसेस डेव्हिस (जलरंग,  १९३९; पहा : मराठी विश्वकोश,  खंड ६,  चित्रपत्र ४४),  फकिरीतील अमिरी (१९४०),  डिव्हाइन फ्लेम (जलरंग,  १९४५),  निरांजनी (कागदावर जलरंग,  १९५२),  स्वातमानंद स्वामी (१९५३-५४) इ. चित्रांपैकी ग्लो ऑफ होप हे चित्र सर्वाधिक गाजले. हे चित्र जयचामराजेंद्र आर्ट गॅलरी (म्हैसूर) येथे असून चित्रातील युवतीच्या कपड्यांचा वास्तवदर्शी पोत आणि त्यातील छायाप्रकाशांचा खेळ ही हळदणकरांच्या चित्रशैलीची खास वैशिष्ट्ये त्यात दिसतात. यात प्रकाशाची योजनाच अशा पद्धतीने केली आहे की,  समईच्या ज्योतीवर समोरच्या बाजूने युवतीने हात धरला असून चेहऱ्याच्या खालच्या बाजूने प्रकाश वरच्या दिशेने येत असल्याची रचना या चित्रात आहे. त्या प्रकाशामुळे युवतीचा चेहरा उजळल्याचे दिसते. साध्या विषयांतून व्यापक दृश्यानुभव व्यक्त करण्याचे कसब,  सूक्ष्म वास्तवदर्शी तपशील,  जलरंग माध्यमातून प्रकाशाचा लोभस प्रत्यय देण्याचे कौशल्य ही त्यांची वैशिष्ट्ये वर उल्लेखिलेल्या काही चित्रांतून प्रकर्षाने जाणवतात. 

त्यांनी रंगविलेल्या व्यावसायिक व्यक्तिचित्रांत नाना शंकरशेठ,  मफतलाल गगलभाई,  शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे इ. उल्लेखनीय आहेत. त्यांनी रंगवलेल्या पं. मदनमोहन मालवीय यांच्या व्यक्तिचित्राचा राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून खास गौरव करण्यात आला दिल्ली येथील ललित कला अकादमीतर्फे १९६२ मध्ये त्यांना अधिछात्रवृत्ती देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट कलाशिक्षक व शास्त्रीय संगीताचे दर्दी जाणकार म्हणूनही हळदणकरांची ख्याती होती. त्यांच्या श्रेष्ठ दर्जाच्या चित्रांनी भारतीय कलेतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे सुपुत्र गजानन सावळाराम हळदणकर (१९१२–८१) हेही श्रेष्ठ दर्जाचे चित्रकार म्हणून ख्यातकीर्त होते. त्यांनी वडिलांकडेच चित्रकलेचे धडे घेतले आणि वडिलांचा कलावारसा पुढे प्रगतिपथावर नेला. सावळाराम हळदणकर यांचे ३० मे १९६८ रोजी निधन झाले. 

प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ : 
विविध क्षेत्रातील २८०० हून अधिक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचा विक्रम करणारे प्रसिद्ध मुलाखतकार, निवेदक सुधीर गाडगीळ यांचा २५ नोव्हेंबर १९५० हा जन्मदिन. गाडगीळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,  उद्योगपती शंतनु किर्लोस्कर,  अभिनेत्री माधुरी दिक्षित,  चित्रकार मकबूल फिदा हुसेन,  गायिका आशा भोसले,  व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्या मुलाखती म्हणजे मान्यवरांशी मारलेल्या अनौपचारिक दिलखुलास गप्पा असतात. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची नावं तपासत लाडे लाडे निवेदन करण्याच्या काळात सुधीर गाडगीळ यांनी स्वत:चं मुलाखतकार आणि निवेदक म्हणून हुकमी स्थान निर्माण केलं. त्यासाठी पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांना खूपच उपयोग झाला.

 सुधीर गाडगीळ यांची कारकिर्द १९७० च्या सुमारास सुरू झाली. १९७१ मध्ये मुंबईत ‘तेजस्वी’ साप्ताहिक सुरू झाले होते. तिथे ते मुंबईचा ब्युरो इन्चार्ज म्हणून काम करू लागले. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रची ऑर्डर हातात असतानाही सुधीर गाडगीळ ‘मनोहर’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले. १९७३ ते १९८० पर्यंत त्यांनी ‘मनोहर’मध्ये काम केलं. ‘मनोहर’ ही त्यांची शेवटची नोकरी. त्यानंतर मुक्त पत्रकारिता केली. 

‘मुलखावेगळी माणसं’, ‘प्रतिमा आणि प्रतिभा’, ‘गजरा’, ‘युवदर्शन’, ‘मुखवटे आणि चेहरे’ असे अनेक दूरदर्शनसाठी कार्यक्रम त्यांनी केले. विशेष म्हणजे लता मंगेशकर,  आशा भोसले,  उषा मंगेशकर,  मीना खडीकर,  पंडित हृदयनाथ मंगेशकर या मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखती घेण्याचा मान सुधीर गाडगीळ यांच्याकडे आहे. आशा भोसले यांच्या जाहीर मुलाखती तर ते सलग २७ वर्ष घेत आहेत. जुलै १९८५ मध्ये त्यांनी आशा भोसले यांची पहिल्यांदा मुलाखत घेतली. प्रकट मुलाखती घेण्याच्या बाबतीत त्यांच्या नावावर राष्ट्रीय उच्चांक आहे. त्यांनी आतापर्यंत ३ हजार ६८२ प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी मुलाखतींवर आधारित ‘मुलखावेगळी माणसं’ असा एकपात्री स्वतंत्र कार्यक्रम केला. अमेरिकेतल्या ५१ शहरांमध्ये आठ वेळा जाऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. दक्षिण पूर्व अमेरिका,  मॉरिशस, जपान,  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका अशा सर्व ठिकाणी महाराष्ट्र मंडळातून हे कार्यक्रम केले आहेत. सुधीर गाडगीळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

(माहिती संकलन : संजीव वसंत वेलणकर) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DVVZCS
Similar Posts
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
मनोहर पर्रीकर, प्रतिभाताई पवार, पांडुरंग नाईक गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांचा १३ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
आशा काळे, अमृता खानविलकर, रझा मुराद, गीता दत्त मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उत्तम नर्तिका आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते रझा मुराद, गायिका गीता दत्त यांचा २३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.
एस. एन. त्रिपाठी पौराणिक चित्रपट संगीताचे बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांचा १४ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language